Padmasana
पद्मासन हे बैठकस्थितीत करायचे योगासन आहे. प्राणायम व ध्यान धारणा करण्यासाठी योगशास्त्रात पद्मासनास फार महत्व आहे. हे आसन नियमित केल्यास त्याचे बरेच फायदे अनुभवता येतात. आपल्या तळ पायांची अंतिम स्थिती कमळा प्रमाणे दिसते म्हणून यास पद्मासन असे म्हणतात. पद्म म्हणजे कमळ. ज्यांचे शरीर लवचिक आहे त्यांना हे आसन चांगले जमते. रोज सराव केल्यास हे आसन करणे शक्य होईल.

आसन प्रवेश
बैठकस्थितीतून या आसनाची सुरुवात होते. (योगासनांचे ४ मुख्य प्रकार व पूर्व स्थिती या पेजवर बैठकस्थितीचे वर्णन केले आहे.) दोन्ही पायात साधारण एक फूट अंतर ठेवून उजवा पाय गुडघ्यात दुमडून डाव्या पायाच्या मांडीवर चवडा ठेवा. आता डावा पाय गुडघ्यात दुमडून उजव्या पायाच्या मांडीवर चवडा ठेवा. आता दोन्ही हात गुडघ्यावर ठेवून ज्ञानमुद्रेत बसा. ज्ञानमुद्रा करताना तर्जनी (पहिल बोट) व आंगठा एकमेकांना जोडून बसा. त्याचवेळेस पाठीचा कणा ताठ ठेवा. मान ताठ देवा. दृष्टी नाकासमोर ठेवून एकीकडे संथ श्वसन सुरु ठेवा. ही आहे पूर्ण आसन स्थिती याच पूर्ण स्थितीमध्ये किमान ५ मिनिटे बसण्याचा सराव करावा व तो थोडा थोडा वेळ रोज वाढवत न्यावा. ध्यानाच्या सरावा साठी हे आसन उत्तम आहे. हे आसन उजवा पाय आधी दुमडून केल्या प्रमाणे डावा पाय आधी दुमडून पण करता येते.

पूर्ण आसन स्थितीतून मूळ बैठक स्थितीत
सर्व प्रथम ज्ञानमुद्रा सोडून दोन्ही हात कमरेच्या दोन्ही बाजूला घेऊन हाताचे तळवे जमिनीवर ठेवावे. नंतर डावा पाय गुडघा ताठ ठेवून लांब सरळ करावा. तसाच उजवा पायही गुडघा ताठ ठेवून लांब सरळ करावा. दोन्ही पाय जुळवून मूळ बैठकस्थितीत बसावे.

पद्मासन केल्याने मिळणारे फायदे
ह्या आसनात बैठक व पाठीचा ताठ कणा यामुळे शरीराच्या बाकी स्नायूनचा ताण कमी होतो पाठीच्या कण्याची कार्यक्षमता सुधारते. ज्ञानमुद्रा केल्यामुळे एकाग्रता वाढते. मन शांत व स्थिर होते. स्मरणशक्ती सुधारते. झोप चांगली लागते. हे आसन नियमित केल्यास शारिरीक व मानसिक दोन्ही दृष्ट्या फायदेशीर ठरेल.
वरील लेखा बद्दल आपला अभिप्राय जरूर द्या. वरील विषया संदर्भात काही अधिक माहिती हवी असल्यास किंवा विषयाला धरून एखाद्या नवीन मुद्या बद्दल माहिती हवी आल्यास आम्हाला जरूर कळवा; आम्ही लवकरात लवकर योग्य माहिती aarogyasakha.com वर प्रकाशित करू. आमची वेबसाईट पाहिल्या बद्दल आपले मनापासून आभार.