5 Elements Wash
आपण आपले आयुष्य जगत असताना कळत नकळत अनेक घटकांचं सहकार्य आपणास लाभते. त्यातील काही घटकांना आपण इतके गृहीत धरलेले असते की त्या घटकांमुळे आपण जगत आहोत हे ही आपल्या लक्षात येत नाही. त्या घटकांच्या प्रति आपण कृतज्ञ असणे म्हणजेच त्यांचे अस्तित्व मान्य करणे. म्हणूनच त्या तत्वांच्या सानिध्यात आपण राहिल्यास त्या तत्वांच्या शक्तीचा आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्यासाठी जास्तीत जास्त उपयोग करून घेणे आपल्या हिताचे आहे. ही तत्वे आपल्याला भरभरून देत असतात. तोच वारसा आपण पुढे आत्मसात करून चालवल्यास आपल्या कर्तृत्वाने जरी आपले हात आकाशाला टेकले तरी पाय मात्र जमिनीवर आपल्या मातीला घट्ट धरून ठेवतील.

आयुर्वेद काळा पासून आज पर्यंत सजीवां पासून निर्जीव वस्तूं पर्यंत अनेक गोष्टीं मध्ये पूजनीय अस्तित्व आहे असे मानून त्या प्रति आदर व भक्तीभाव जोपासला जातो. त्यात दसऱ्याला शस्त्र, यंत्र व वाहनांची पूजा तर पोळ्याला बैलाची पूजा, विविध सणा निमित्याने झाडाची, नदीची, वही, पुस्तक, चोपडीची (खाते वही), आपले आई-वडील, गुरु, विविध देवतांच्या मूर्तींची अगदी दगडाची सुद्धा पूजा तितक्याच भावनेने केली जाते. त्यात प्रामुख्याने कृतज्ञता व्यक्त करणे हा मुख्य हेतू असतो.
आपण अनेक वेळा अनुभवलं असेल की आपण स्नान केल्यावर जास्त उत्साही, ताजेतवाने व तरतरीत असतो. तसेच आपण बाहेर फिरायला समुद्र किंवा नदी किनारी, बागेत, रानावनात, एखाद्या टेकडीवर किंवा डोंगरावर जातो तेव्हाही आपल्याला खूप आनंददायी व चांगले वाटते. आपण वेगवेगळी फळ, भाज्या, धान्य यांचे विविध पदार्थ बनवून त्याचे सेवन केल्यावर आपल्याला खूप समाधान मिळते. एखाद्या चांदण्या रात्री आकाश निरीक्षण किंवा सूर्योदय किंवा सूर्यास्ताच्या वेळचे आकाश पाहिल्यावर आपणास खूप आनंदी व उत्साही वाटते. याचे मूळ कारण म्हणजे वरील सर्व घटकांशी आपली नाळ जोडलेली आहे. ते घटक म्हणजेच तत्व आहेत व ही तत्व म्हणजेच मूळ स्वरूप होय. ही पाच तत्व म्हणजेच आकाश, वायू, अग्नी, जल, पृथ्वी. याच पंच तत्वांनी आपले शरीर बनलेले असते. ह्या पाचही तत्वांचे विशिष्ठ प्रमाणात आपल्या शरीरात सहभाग असतो. त्यांच्या सहभागा शिवाय आपले अस्तित्व अशक्य आहे. या पाच तत्वांनी ब्रह्माण्डातील प्रत्येक घटक बनला आहे. ह्या पाचही तत्वांन मधील प्रचंड शक्ती मुळेच यांना पंच महाभुते असेही म्हणतात.

आकाश
आकाशात पूर्ण ब्रह्मांड सामावले आहे. प्रचंड मोठी पोकळी आहे. ह्या आकाश तत्वाचा आपल्या शरीरातील सहभाग म्हणजे आपलं मन. ह्या मनात रोज हजारो गोष्टींच्या विचारांचे ग्रह भ्रमण करत असतात तर जुन्या आठवणी धूमकेतू सारख्या येऊन जातात. आपले शरीर जरी मास पेशींनी भरलेले असले तरी त्यात बरीच पोकळी आहे. जसे श्वास नलिका, अन्न नलिका, जठर, लहान आतडं, मोठं आतडं, सर्व रक्त वाहिन्या यातून विविध घटक वाहतात म्हणजेच ते सर्व पोकळ आहेत.
आपल्या शरीरातील आकाश तत्व सक्रिय करायचे असल्यास आकाश स्नान करणे आवश्यक आहे. याचा अर्थ असा की वरती बघितल्यावर आपल्या डोळ्यांना फक्त आकाश दिसेल अश्या जागी बसून किंवा आडवे होऊन आकाश किमान १० ते १५ मिनिटे न्याहाळावे. आकाश तत्वाची ऊर्जा आपल्या डोळ्यात साठवून घ्यावी. ज्यांना आध्यात्मिक प्रगती करायची आहे त्यांनी डोळे मिटून मनात कोणताही विचार न आणता जेव्हडा वेळ बसता येईल तेव्हडा वेळ बसावे. यालाच शून्य विचारात बसणे असे म्हणतात. असे केल्याने आपल्या शरीराची (मनाची) शुद्धी होते. म्हणजेच आपल्या शरीरातिल आकाश तत्व संतुलित राहते. आपली कार्यक्षमता सुधारते.
वायू
दिवसभर पंख्याखाली किंवा एअर कंडिशन मध्ये बसूनही जेव्हा आपण मोकळ्या हवेतून येणारी वाऱ्याची झुळूक अंगावर घेतो तेव्हा आपल्याला शतपटीने बर वाटतं. या वायू तत्वाचा आपल्या शरीरातील रक्त, मल, मूत्र पुढे सरकावण्याच्या कार्यात सहभाग असतो. आपल्या शरीरातील हे तत्व असंतुलित झाल्यास आपणास अनेक व्याधीं बरोबर सामना करायची वेळ येऊ शकते.
आपले शरीर पाच प्रकारच्या वायूमुळे चालत असते. त्यातील प्राणवायू आपणास वायू तत्वामुळेच मिळतो. हे वायू तत्व आपल्या शरीरात संतुलित ठेवायचे असल्यास वायू स्नान आवश्यक आहे. त्यासाठी मोकळ्या व शुद्ध हवेत फेरफटका मारावा. शरीरातील वायू तत्व संतुलित करण्यासाठी दीर्घ श्वसन करावे.
दीर्घ श्वसनाचा सराव केल्यास फुपुसाचे व ओघाने आपले आरोग्य उत्तम राहते. (श्वसना संबंधीचा लेख ह्याच वेबसाईटवर उपलब्ध आहे.)
अग्नी
अग्नी तत्वामुळेच समस्त सजीव प्रजातीना ऊर्जा मिळते. सूर्याच्या ऊर्जेमुळे आपल्याला ड जीवनसत्व मिळते. अग्नी चे बरेच प्रकार आहेत. आपण जे अन्न ग्रहण करतो ते पचवण्याचे काम आपल्या जठरातील अग्नी म्हणजेच जठराग्नीमुळे होत असते. आपल्या शरीरातील तापमान व आपण जी काही कर्म करतो त्यासाठी लागणारी ऊर्जा आपल्याला अग्नी तत्वामुळे मिळते.
आपल्या शरीरातील अग्नी तत्व संतुलित ठेवण्यासाठी सूर्य स्नान आवश्यक आहे. सूर्योदय होत असतानाचे कोवळे ऊन किमान १५-२० मिनिटे अंगावर घ्यावे. शक्यतो हात, पाय व चेहरा कपड्यानी झाकलेला नसावा. तसेच भूक लागल्यावर काही खायच्या आधी एक छोटा घोट साधं पाणी प्यावे त्यामुळे जठराग्नी आणखी जास्त कार्यशील होतो.
जल
जल हे आपल्या शरीरातील एक महत्वाचं तत्व आहे. जसे पृथ्वीचा बराच पृष्ठभाग पाण्यानी व्यापलेला आहे. तसेच आपल्या शरीराचा बराच भाग पाण्याने व्यापलेला आहे. आपल्या शरीरातील विविध अवयवान मध्ये व रक्ता मध्ये हे पाणी शरीरास आवश्यक असणारे स्त्राव / द्रव (फ्लुइडच्या) स्वरूपात असते.

आपण रोज स्नान करतो म्हणजेच शरीर स्वच्छ करतो. हा हेतू आपणास माहीत आहेच परंतु आपण त्या बरोबरच नकळत आपल्या शरीरातील जल तत्व संतुलित करत असतो. आपण तहान लागते म्हणून पाणी पितो परंतु तहान लागणे म्हणजेच आपल्या शरीरातील जल तत्व कमी झाल्याचे ते संकेत असतात. आपण पाणी पिऊन कळत नकळत शरीरातील जलतत्त्व संतुलित करत असतो. ऋतुमाना नुसार व आपल्या शारिरीक हालचाली नुसार शरीरात जलतत्वाचा वापर होत असतो.
जलतत्वातील एक विशेष म्हणजे ह्या जलतत्वाला स्मरणशक्ती व भावना असतात. जे वेगवेगळ्या प्रयोगाने सिद्ध झाले आहे. आपल्या विचारांचे परिणाम मनावर व मनाचे परिणाम शरीरावर होतात. म्हणूच आपले आई, वडील, गुरुजन व तज्ञ मंडळी आपल्याला सकारात्मक विचार करायला सांगतात. आपल्या शरीरात जलतत्वाचे प्रमाण हे बाकी घटकां पेक्षा खूप जास्त आहे. म्हणजेच विचार, मन, शरीर यांच्या बरोबरीने जलतत्वाचा सहभाग त्या प्रक्रियेत असतो हे स्पष्ट होते. पाण्याची मुबलक उपलब्धता असल्यास सकाळी व संध्याकाळी दोन वेळा जल स्नान करावे.
पृथ्वी
पृथ्वी तत्व म्हणजेच जमीन / माती. आपण जे अन्न ग्रहण करतो ते मूळ स्वरूपात जमिनी मधूनच उगवते. निरनिराळ्या आकाराची, रंगांची व चवीची फळ, भाज्या व धान्य याच मातीतून उगवतात हीच माती त्या सर्व वनस्पतींचे पोषण करतात आणि त्या वनस्पतिंना आपण आपल्या भोजनात वापरतो त्यामुळे आपलेही पोषण याच मातीमुळे होते.
पृथ्वी तत्वानी स्नान म्हणजेच यात अंगाला माती लेपन करतात, बऱ्याच महिला फेस पॅक म्हणून मुलतानी माती वापरतात. कुस्ती, कब्बडी सारखे मातीतील खेळ, काही व्यक्ती मड थेरेपी करतात. हे प्रत्येकाला शक्य होईलच असे सांगता येत नाही. आपण नुसते अनवाणी जमिनीवर चाललो किंवा मातीत हात घालून बाग काम, वृक्षावरोपण जरी केले तरी पृथ्वी तत्वांनी स्नान केल्याचे फायदे आपणास मिळतील.
पंचतत्त्व स्नानाच्या माध्यमातून आपण पंचतत्वांच्या सानिध्यात राहणे हे जास्त महत्वाचे आहे. ज्या पंच तत्वांनी आपले शरीर बनले आहे. त्याच तत्वांकडून आपल्या शरीराची बॅटरी रोज “रिचार्ज” केल्यास आपल्या आयुष्याची गाडी कुठलाही त्रास न देता लांबचा पल्ला गाठेल यात शंका नाही.
सोशल मीडियाच्या भाषेत Stay tuned… Stay connected… With Nature.
वरील स्नानाचे प्रकार हे व्यक्ती, प्रकृती व ऋतुमाना नुसार कमी अधिक फायदेशीर होऊ शकतात. ह्याचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत तरी खबरदारी म्हणून ज्या व्यक्तींना वर उल्लेख केलेल्या तत्वांचा काही विशेष त्रास असेल त्यांनी तज्ञानचा सल्ला घ्यावा.
वरील लेखा बद्दल आपला अभिप्राय जरूर द्या. वरील विषया संदर्भात काही अधिक माहिती हवी असल्यास किंवा विषयाला धरून एखाद्या नवीन मुद्या बद्दल माहिती हवी आल्यास आम्हाला जरूर कळवा; आम्ही लवकरात लवकर योग्य माहिती aarogyasakha.com वर प्रकाशित करू. आमची वेबसाईट पाहिल्या बद्दल आपले मनापासून आभार व धन्यवाद.
Very informative… Providing nice guidance for healthy lifestyle 👍👍