Boost your Immunity with Home Remedies
लहानां पासून मोठ्यान पर्यंत सर्वानाच ऋतुमाना नुसार सर्दी, खोकला, ताप व साथीचे आजार होत असतात. त्याला मुख्य कारण म्हणजे रोगप्रतिकार शक्ती कमी होणे. आपल्या शरीरात नैसर्गिकरित्या खूप रोग प्रतिकार शक्ती असते. पण ती टिकवण्यासाठी व वाढवण्यासाठी रोजची दिनचर्या फार महत्वाची आहे. आपण चौरस आहार(खरंतर षड्रस आहार) घेतो का? काय खातो, कधी खातो, किती खातो, व्यायाम करतो का? तसेच रोज पुरेसं पाणी पितो की नाही व आपली झोप योग्य वेळी व पुरेशी होते कि नाही शिवाय कोणत्याही प्रकारचे धूम्रपान आहे का? अश्या अनेक गोष्टींवर आपली रोग प्रतिकार शक्ती अवलंबून असते.
खरंतर षड्रस आहार म्हणजेच कडू, आंबट, तुरट, खारट, तिखट व गोड आपल्या रोजच्या आहारात असतील तर अनेक व्याधींन पासून आपले सौरक्षण होईल. आपली रोग प्रतिकार शक्ती आपोआपच वाढेल
आयुर्वेदा नुसार काही औषधी पदार्थ एकत्र पाण्यात उकळवून त्याचा काढा बनवला तर ते रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी उत्तम उपाय ठरतात. त्यातलेच काही काढे आपण जाणून घेणार आहोत. खाली दिलेली काढा बनवण्याची कृती ही एका कपाला व एका वेळेसाठीचे प्रमाण आहे.
१) हळदीचं दूध साहित्य :
१ कप पाणी, १ कप दूध, पाव चमचा हळद, खडी साखर किंवा शुध्द गूळ चवीनुसार
गुणधर्म : ह्या काढ्यात आपण विविध औषधींचा वापर करणार आहोत त्यांचे गुणधर्म आपण पाहूया.
हळद ही औषधी वनस्पती आहे. सर्दी, खोकला, घश्यातील इन्फेक्शन कमी करण्यासाठी उत्तम आहे. हळदीमुळे शरीरातील वात, पित्त व कफ यांच संतुलन ठेवण्यास मदत होते. रोगप्रतिकार शक्ती वाढते, हळदीमधील कर्क्युमिन मुळे ह्रदय रोग, अल्झायमर व कर्क रोगाला आळा घाण्यास प्रभावी आहे. लिव्हर मधील विषद्रव्य बाहेर काढले जातात. (डिटॉक्सिफिकेशन होते.), हळद ही जखम बरी करण्यासाठी व वेदना कमी करण्यासाठी खूपच उपयोगी आहे. या सर्व गुणधर्मान मुळेच कदाचित हळदीला हिंदू धर्मात शुभ कार्यासाठी व सौभाग्य लेणं म्हणून फार महत्व आहे.
दूध हे कॅल्शिम व विविध खनिजांनी युक्त आहे. दुधामुळे दात व हाडे बळकट होतात. वजन कमी करण्यास मदत होते. त्वचा चांगली होते.
खडीसाखर ही खोकल्यावर उत्तम औषधी आहे. खडीसाखरेचे सेवन केल्याने हिमग्लोबिनचे प्रमाण वाढते. थकवा दूर करण्यासाठी व झटपट एनर्जी मिळवण्यासाठी खडीसाखर खुपच उपयुक्त आहे. रोगप्रतिकारशक्ती वाढते.
गूळ हा उष्ण पादार्थ असल्यामुळे ऊर्जा उत्पन्न होते. भरपूर लोहयुक्त पदार्थ. झटपट एनर्जी मिळवण्यासाठी याचा उपयोग होतो. म्हणून आजही खेडेगावात उन्हा मधून किंवा बाहेरून कोणी आले तर गूळ व पाणी देतात.
कृती : आधी पाणी व दूध एकत्र उकळवत ठेवावे. उकळी आली की त्यात हळद घालावी हळदयुक्त दूध एक दोन मिनिट उचळु द्यावे नंतर त्यात चवी नुसार खडी साखर किंवा गूळ घालावा (खडीसाखर किंवा गुळाची पावडर वापरली तरी चालेल). हे दूध एक कप होई पर्यंत आटवावे. हे दूध गाळून कपात/ग्लास मध्ये ओतावे.
हे तयार झालेले दूध गरम असतानाच घोट घोट प्यावे. हा उपाय दिवसभरात कधीही करून चालतो. ज्यांना मधुमेह आहे अश्या व्यक्तींनी साखर वापरू नये.
२) आयुर्वेदिक काढा
साहित्य : २ कप पाणी, पाव चमचा सुंठ पावडर (सुंठ नसल्यास १ इंच आलं वापरल तरी चालेल), ५-६ काळी मिरी दाणे, एक वेलदोडा / वेलची, १ इंच दालचिनी (पावडर वापल्यास एक चिमूट), १ लवंग, पाव चमचा हळद, खडी साखर किंवा शुध्द गूळ चवीनुसार.
गुणधर्म : ह्या काढ्यात आपण विविध औषधींचा वापर करणार आहोत त्यांचे गुणधर्म आपण पाहूया.
यातील सुंठ पावडर ही पोटदुखी, पोटात मळमळणे, पोटातील गॅस बाहेर काढणे व चयापचन सुधारण्यासाठी खूपच उपयुक्त आहे. आलं सर्दी खोकला घश्यातील अडकलेला कफ बाहेर काढण्यासाठी खुपच उपयुक्त आहे.
यातील काळी मिरी मुळे पचन सुधारते, बद्धकोष्ठ प्रतिबंधक, श्वसन रोग, सांधेदुखी, केसांच्या समस्या, त्वचेच्या समस्या यांवर गुणकारी. हळद व मिरी यांच्या एकत्रित वापरानं कर्करोगास (कॅन्सर) प्रतिबंध करते.
यातील वेलदोडा / वेलची / इलायची ही अँटीऑक्सिडेन्ट आहे. रक्त दाब कमी करण्यासाठी उपयुक्त, अँटी इंफ्लामेंटरी तत्व यात आहेत. पचन क्रिया सुधारते. तोंडाची दुर्गंधी घालवते व तोंडातील किटाणू पासून व बॅक्टेरियाच्या वाढी पासून सौरक्षण मिळते. रक्त दाब कमी करण्यासाठी याचा उपयोग होतो.
यातील लवंग सेवनाने रोगप्रतिकार शक्ती सुधारते. खोकल्याची ढास थांबवण्यासाठी, सांधे दुखी, दात दुखी, तोंडाची दुर्गंधी पोटातील मळमळ थांबवण्या साठी उपयुक्त.
हळद खडीसाखर व गुळाचे फायदे वरील मुद्यात विस्तृतपणे दिले आहेत.
कृती : आधी दोन कप पाणी गरम करत ठेवा. नंतर त्यात पाव चमचा सुंठ पावडर टाकावे. नंतर ५-६ काळी मिरी दाणे कुटून भरड करून त्या पाण्यात टाकावी. त्यानंतर एक वेलदोडा सोलून त्यातील दाणे कुटून भरड करून त्या पाण्यात टाकावी. लवंग तोडून पाण्यात टाकावी. नंतर पाव चमचा हळद व चवी नुसार खडी साखर किंवा शुध्द गूळ घालावा. हे मिश्रण चांगले उकळून एक कप उरेल इतके आटू द्यावे. हा काढा गाळून कपात/ग्लास मध्ये ओतावे.(काळी मिरी, वेलची, लवंग व खडीसाखर एकत्र कुटून वापरले तर जास्त सोयीचं होईल.)
हा तयार झालेला काढा गरम असतानाच घोट घोट प्यावा. हा उपाय दिवसभरात कधीही करून चालतो. ज्यांना मधुमेह आहे अश्या व्यक्तींनी साखर वापरू नये.
३) आयुर्वेदिक काढा
साहित्य : २ कप पाणी, १५ ते २० तुळसी ची पानं (सोबत तुळसीच्या डिक्शा / काड्या पण चालतील), एक इंच आलं, खडी साखर किंवा शुध्द गूळ चवीनुसार.
गुणधर्म : ह्या काढ्यात आपण विविध औषधींचा वापर करणार आहोत त्यांचे गुणधर्म आपण पाहूया.
तुळस ही अँटी ऑक्सिडंट आहे. ताप, सर्दी, खोकला या साठी अत्यंत गुणकारी आहे. तुळसी मुळे रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते. तुलसी मध्ये अँटी बॅक्टेरियल गुणधर्म आहेत. तुळस रक्तातील शर्करा नियंत्रित करते त्या मुळे मधुमेह असलेल्या व्यक्तींसाठी खूपच उपयोगी आहे .
यातील आलं हे पोटदुखी, पोटात मळमळणे, पोटातील गॅस बाहेर काढणे व चयापचन सुधारण्यासाठी खूपच उपयुक्त आहे. आलं सर्दी खोकला घश्यातील अडकलेला कफ बाहेर काढण्यासाठी खुपच उपयुक्त आहे.
कृती : आधी २ कप पाणी गरम करत ठेवावे. त्यात वर नमूद केलेली तुळसीची पानं कात्रीने बारीक तुकडे करून त्या पाण्यात टाकावे. एक इंच आलं किसून त्या पाण्यात टाकावे. नंतर चवीनुसार खडीसाखर / गूळ त्या पाण्यात टाकावा व एक कप होईपर्यंत आटवावे. नंतर हा काढा गाळून कपात/ग्लास मध्ये ओतावा.
हा तयार झालेला काढा गरम असतानाच घोट घोट प्यावा. हा उपाय दिवसभरात कधीही करून चालतो. ज्यांना मधुमेह आहे अश्या व्यक्तींनी साखर वापरू नये.
वरील सर्व उपचार हे व्यक्ती, प्रकृती व ऋतुमाना नुसार कमी अधिक फायदेशीर होऊ शकतात साथीचे आजार पसरत असतात त्या कालावधीत दिवसातून दोन वेळा काढा सेवन केल्यास फायदेशीर होईल. वर नमूद केलेले सर्व काढे रोज वेगवेगळा एक काढा सेवन केला तरी ते फायदेशीर होईल.या काढ्याचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत तरी खबरदारी म्हणून ज्या व्यक्तींना काढा बनवताना वापरलेल्या औषधींचा काही विशेष त्रास असेल त्यांनी तज्ञानचा सल्ला घ्यावा.
वरील लेखा बद्दल आपला अभिप्राय जरूर द्या. वरील विषया संदर्भात काही अधिक माहिती हवी असल्यास किंवा विषयाला धरून एखाद्या नवीन मुद्या बद्दल माहिती हवी आल्यास आम्हाला जरूर कळवा; आम्ही लवकरात लवकर योग्य माहिती aarogyasakha.com वर प्रकाशित करू. आमची वेबसाईट पाहिल्या बद्दल आपले मनापासून आभार.
