4 Types of Yogasana and their Initial Position
श्री पतंजली महामुनी यांनी योगसूत्रे या ग्रंथात योग शास्त्राची आठ अंगांचे वर्णन केले आहे. या योगाला अष्टांग योग असे म्हणतात. या आठ पायऱ्यान मधील तिसरी पायरी म्हणजे योगासन. ही अष्टांगे म्हणजे आत्म्या कडून परमात्म्याकडे जाण्याच्या आठ पायऱ्या आहेत. योगशास्त्राचे आद्य प्रणिते श्री पतंजली महामुनी यांनी या योगासनांचे अष्टांगात नेमके काय प्रयोजन आहे ते स्पष्ट केले आहे. पण साद्य स्थितीला मूळ उद्देश बाजूला राहिला आहे. कारण बहुतेक जण योगासन म्हणजे एक नवीन ट्रेण्ड, फॅशन, लाईफ स्टाईल किंवा कसरती करण्याचा व्यायाम प्रकार अश्या दृष्टीने योगासनांकडे बघतात. त्यामुळे मूळ उद्देश बाजूलाच राहतो व योगासनांचे संपूर्ण फायदे मिळत नाहीत.
वेगवेगळ्या आसनांचे प्रयोजन हे मुख्यत्वे शरीराच्या विविध अवयवांना तसेच स्नायूंना व सांध्यांना चांगला ताण व व्यायाम मिळावा म्हणून केलेले असते. ही सर्व योगासने करताना शरीर लवचिक होते. प्रत्येक योगासनात वेगवेगळ्या हालचाली करताना श्वास नियंत्रित ठेवावा लागतो त्या मुळे फुपूस, हृदय व श्वासोत्श्वासाचा दर्जा सुधारतो. योगासनांचे बरेच प्रकार भारता पासून संपूर्ण विश्वात अनेक जण करत आहेत. या सर्व आसनांचे निरीक्षण केल्यास व त्या सर्व आसनांची विभागणी केल्यास असे लक्षात येते की या सर्व योगासनांचे चार प्रमुख प्रकार होतात.

सर्व ४ प्रकारची आसनं करताना त्या त्या आसनांची पूर्व स्थिती पण जाणून घेणे गरजेचे आहे. योगासने करताना प्रत्येक योगासनात वेगवेगळ्या शारिरीक अवस्था असतात त्या त्या अवस्थेमध्ये श्वासोश्वासाचे तंत्र काटेकोर पाळावे. योगासन करताना व पूर्ण स्थितीत आल्यावर ठराविक वेळ आदर्श स्थिती टिकवून ठेवण्याला जास्त महत्व आहे.
योगासनांचे चार मुख्य प्रकार :
१) उभ्यानी करावयाची योगासने
२) बसून करावयाची योगासने
३) पाठीवर झोपून करावयाची योगासने
४) पोटावर झोपून करावयाची योगासने
🅞 दंडस्थिती :
(उभे राहून योगासने करण्यासाठीची पूर्वस्थिती ) यात सरळ ताठ उभे राहावे. गुढघे ताठ ठेवावेत दोन्ही पायाचे आंगठे व टाचा जुळवून ठेवाव्यात. मान, पाठ, खांदे, छाती सरळ व ताठ ठेवून नजर नाकासमोर सरळ ठेवावी. दोन्ही हात मांडीला चिकटून ठेवावेत. दोन्ही हाताची बोटे एकमेकांना चिकटून ठेवावीत. बोटे जमिनीच्या दिशेने असावीत.

🅞 बैठकस्थिती :
(बसून योगासने करण्यासाठीची पूर्वस्थिती ) या बैठक स्थितीत बसलेल्या अवस्थेत आपले दोन्ही पाय सरळरेषेत ताठ लांब करावेत. टाचा, पोटऱ्या व मांड्या जमिनीला टेकलेल्या असाव्यात. पायाची बोटे ताणून वरच्या दिशेला ठेवावीत. कंबर, पाठ, मान, डोके सर्व एका रेषेत ताठ ठेवावे. दोन्ही हाताचे पंजे शरीरा शेजारी जमिनीला टेकून ठेवावेत. हाताची बोटे एकमेकांना चिकटून ताठ सरळ ठेवावीत. हाताचा अंगठा बोटांना काटकोनात ठेवावा.

🅞 शयनस्थिती :
(पाठीवर झोपून योगासने करण्यासाठीची पूर्वस्थिती ) यात जमिनीवर पाठ टेकेल असे आडवे व्हावे. पाय सरळरेषेत ताठ लांब करावेत. टाचा, पोटऱ्या व मांड्या जमिनीला टेकलेल्या असाव्यात. पायाची बोटे ताणून वरच्या दिशेला ठेवावीत. कंबर, पाठ, मान, डोके सर्व एका रेषेत ताठ ठेवावे. दोन्ही हाताचे पंजे शरीरा शेजारी जमिनीला टेकून ठेवावेत. हाताची बोटे एकमेकांना चिकटून ताठ सरळ ठेवावीत.

🅞 विपरीत शयनस्थिती :
(पोटावर झोपून योगासने करण्यासाठीची पूर्वस्थिती ) हि स्थिती शयन स्थितीच्या उलट म्हणजे पोटावर आडवे व्हायचे असते. म्हणून याला विपरीत शयन स्थिती असे म्हणतात. या स्थितीत हनुवटी, छाती, पोट, मांड्या, गुढघे, पायाचे चौडे जमिनीला टेकलेले असावेत. पायाच्या बोटांची नखे जमिनीला टेकलेली असावीत. हनुवटी जमिनीला टेकलेली असताना नजर समोर ठिवावी. दोन्ही हात जमिनीवर पायांच्या बाजूला तळवे जमिनीला टेकलेल्या अवस्थेत ठेवावेत. हाताची बोट ताठ सरळ रेषेत ठेवावीत.

वर वर्णन केल्याप्रमाणे कोणत्याही आसन प्रकारात वरील पैकी पूर्व स्थिती घ्यावी या सर्व आदर्श स्थिती आहेत.
वरील लेखा बद्दल आपला अभिप्राय जरूर द्या. वरील विषया संदर्भात काही अधिक माहिती हवी असल्यास किंवा विषयाला धरून एखाद्या नवीन मुद्या बद्दल माहिती हवी आल्यास आम्हाला जरूर कळवा; आम्ही लवकरात लवकर योग्य माहिती aarogyasakha.com वर प्रकाशित करू. आमची वेबसाईट पाहिल्या बद्दल आपले मनापासून आभार.