MRP Rs.170/- Allover Maharashtra No Courier charge.
भारतीय शास्त्रोक्त मसाज करण्याचे फायदे खूप आहेतच शिवाय अबाल वृद्धांच्या शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी
आवश्यक उपचार पद्धती आहे. जसं मसाज हे एक शास्त्र आहे; तसेच मसाज करणं ही एक कला आहे. आधुनिक काळात ही कला शिकण्यासाठी विविध संस्था उपलब्ध आहेत. आजच्या काळात बरेच निष्णात मसाज करणारे महिला व पुरुष या क्षेत्रात चांगले योगदान देत आहेत.
मसाज म्हणजे काय ?
शरीराच्या व मनाच्या स्वास्थ्यासाठी शरीरावर तेल लावून विशिष्ठ व विविध पद्धतीने घर्षण व दाब देण्याच्या क्रियेला मालिश (मसाज) असे म्हणतात.
ज्ञात असलेल्या इतिहासा नुसार साधारण ३००० वर्षां पूर्वी पासून मसाज (मालिश) करण्याची कला अस्तित्वात आहे. आज जगभरात सर्वत्र मसाज करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती विकसित झाल्या आहेत. मसाज करण्याच्या विविध पद्धती त्या त्या देशाच्या नावानी प्रचलित आहेत. उदा. स्वीडिश मसाज, थाई मसाज, जपान मधील शियातसु, युएसए मधील स्टोन मसाज तसेच भारतीय आयुर्वेदिक मसाज. भारतात अनेक ठिकाणी तेल चोपडून केले जाणारे चंपी मालिश प्रसिद्ध आहे. तसेच पारंपरिक मसाज पद्धत व केरळी मसाजचे विशेष महत्व भारतात आहे. विविध देशांनुसार साधारणपणे ३५ पेक्षा जास्त मसाजचे प्रकार आहेत. तसेच चायना, जपान, भारता सहित काही देशात ऍक्युप्रेशर मसाज व रिफ्लेक्सोलॉजि चा वापर करून मसाज केला जातो.
आपल्या भारतीय पद्धतीत गरजे नुसार वेगवेगळे मसाज प्रकार उपलब्ध आहेत.
१) आयुर्वेदिक मसाज (आयुर्वेदिक तेलाच्या साहायाने केला जाणार) नवजात शिशु पासून वयोवृद्ध व्यक्ती पर्यंत सर्वांसाठी उपयुक्त.
२) कोरडा मसाज (तेलविरहित अंगावरील कपड्यावरून करता येण्या जोगा) सर्व व्यक्तीसाठी उपयुक्त.
३) पावडर मसाज (अंगाला तेलाच्या ऐवजी पावडर लावून केलेला मसाज) थकवा दूर करण्यासाठी तसेच लठ्ठ व्यक्तीसाठी जास्त उपयुक्त.
४) ऍक्युप्रेशर मसाज (शरीरावरील ऍक्युप्रेशर पॉइंटवर दाब देऊन केलाजाणारा मसाज) वेगवेगळ्या व्याधींसाठी उपयुक्त.

भारतीय शास्त्रोक्त मसाज करण्याच्या १२ थबक्या (शरीराच्या विविध भागांवर गरजे नुसार वापरण्यासाठी.)
♦ घर्षण : दोन्ही हाताच्या बोटांनी किंवा तळहातानी हृदयाच्या दिशेने करावयाची कृती. ही क्रिया शरीरावर सर्व ठिकाणी करता येते. प्रत्येक विशिष्ट थबक्यां नंतर ही क्रिया केल्यास अधिक लाभदायक ठरते. ही थबकी मांसल भागावर जेव्हढा दाब देऊ त्या पेक्षा कमी दाब नाजूक भागावर व हाडांवर द्यावा.
♦ रुतवणे : हीकृती मांसल भागावर दोन्ही हाताच्या बोटांच्या टोकाचा वापर करून करतात. ही क्रिया करताना हात सैल सोडून केल्यास अधिक प्रभावी ठरते.
♦ चिमटी : मांसल भागावर हाताचा आंगठा व पहिली दोन बोट (तर्जनी व मध्यमा) वापरून करतात. तसेच चार बोट व अंगठा वापरूनही ही क्रिया करता येते. ही क्रिया जलद केल्यास जास्त प्रभावी ठरते.
♦ पीळ : आंगठा व बोटं यांचा वापर करून करावयाची कृती. ही थबकी मांसल भागावर जेव्हढा दाब देऊ त्या पेक्षा कमी दाब नाजूक भागावर व हाडांवर द्यावा. ही क्रिया जलद केल्यास जास्त प्रभावी ठरते.
♦ खडी थबकी : दोन्हि हातांची चार बोट वापरून बोटांचा आवाज होईल अशी कृती / हात हलका ठेऊन उभ्या तळहातानी परंतु जलद गतीने केल्यास जास्त प्रभावी ठरते.
♦ आडवी थबकी : आडवा हात ठेवून बोटांची पोकळ थबकी (कब्बडी खेळताना मांडीवर थाप मारतात तशी कृती.) ही थबकी पाठीवर, मांडीवर तसेच पोटरीवर करण्यास योग्य.
♦ घुसळणे : दोन्हि हातांचे तळवे वापरून ही कृती करतात (कणिक मळतो तशी.) ही क्रिया पोटावर करताना उजवीकडून डावीकडे करावी. हलका ते माध्यम दाब द्यावा.
♦ मृदूंग : दोन्हि हातांची चार बोट अर्ध्यावर वाकवून करावयाची कृती. किंवा पोकळ मुठीनी करावयाची कृती.
♦ चेपणे : दोन्हि हाताच्या पंजाचा वापर करून करावयाची कृती.
♦ कंपन : हाताच्या चार बोटांनी / तळव्यांनी ही कृती करतात. ही कृती करताना हात हलका ठेऊन जलद किंवा सावकाशपणे ही क्रिया केली जाते. ही क्रिया तुटक न करता सलग केल्यास फायदेशीर ठरतो.
♦ कीटक संचलन : बोटांच्या टोकांनी करावयाची कृती.
♦ स्पर्श : बोटांच्या टोकांनी करावयाची कृती. मसाज पूर्ण झाल्यावर सर्वांगाला करावयाची सगळ्यात शेवटची कृती. ही कृती हलक्या हाताने केल्यास प्रभावी ठरते.
पूर्ण शरीराला मसाज करण्यासाठी वरील सर्व थबक्यांचा वापर केला जातो. शरीराच्या विशिष्ट अवयवांना विशिष्ट थबकी वापरली तर मसाज घेणाऱ्याला जास्त व लवकर आराम मिळतो. वरील थबक्या देताना ज्या व्यक्तीला मसाज देणार आहोत त्याचे वय, प्रकृती, आजार यांचा विचार करूनच आरामदायी वाटेल इतका दाब देऊन मसाज द्यावा.
वरील थबक्यांचा वापर करताना तज्ञानचा साल्ला जरूर घ्यावा. निरोगी व सुद्दृढ आरोग्यासाठी पूर्ण शरीराला मसाज घ्यायचा असल्यास किमान महिन्यातून एकदा तरी घ्यावा. डोकं, कान व तळपाय यांना रोज अभ्यंग करावा. (तेललावून मसाज करावा).
मसाज करण्याचे फायदे
~ उत्साह वाढतो
~ शरीराची कार्य क्षमता सुधारते
~ त्वचा तुकतुकीत होते
~ स्नायू बळकट होतात
~ थकवा जातो
~ झोप शांत लागते
~ रक्ताभिसरण चांगले होते
~ वात संतुलित होतो
~ त्वचेला सुरकुत्या लवकर पडत नाहीत
~ आयुर्मान सुधारते
मसाज कोणी करावा
नवजात शिशू पासून वृद्ध व्यक्तीं पर्यंत सर्व स्री -पुरुषांनी करावा.
मसाज कधी करू नये
◉ जखम, फोड, गळू झालेल्या जागी करू नये.
◉ त्वचा विकार असल्यास त्या जागी करु नये.
◉ अस्थिभंग (फ्रॅक्चर) झाला असेल त्या जागी करू नये.
◉ शल्य चिकित्सा (ऑपरेशन झालेल्या जागी ३ ते ६ महिने) करू नये.
◉ जेवण झाल्यावर करू नये.
◉ गर्भवती स्रीला छाती पासून ओटीपोटा पर्यंत करू नये (आवश्यक असल्यास तज्ञानचा सल्ला घेणे).
◉ स्त्रियांनी मासिक धर्म काळात पोटाला करू नये.
◉ ताप आलेला असल्यास करू नये.
◉ डीप व्हेन थ्रोम्बोसिस, सोरायसिस, किंवा हत्ती पाय आजार झालेल्या व्यक्तींनी पायाला मसाज करू नये.
मसाज उपचार म्हणून कधी करावा
अंगदुखी, डोकेदुखी, मान, पाठ व कंबरेत उसण भरली असल्यास, सायटिका, व्हेरिकोज व्हेन्स, लकवा तसेच शरीरास व मनास आराम देण्यासाठी सुद्धा मसाज उपचार फायदेशीर आहे.
वरील लेख सर्वसाधारण माहिती म्हणून प्रस्तुत केला आहे. वर दिलेल्या माहितीचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत तरी खबरदारी म्हणून तज्ञानचा सल्ला घ्यावा.
वरील लेखा बद्दल आपला अभिप्राय जरूर द्या. वरील विषया संदर्भात काही अधिक माहिती हवी असल्यास किंवा विषयाला धरून एखाद्या नवीन मुद्या बद्दल माहिती हवी आल्यास आम्हाला जरूर कळवा; आम्ही लवकरात लवकर योग्य माहिती aarogyasakha.com वर प्रकाशित करू.
आमची वेबसाईट पाहिल्या बद्दल आपले मनापासून आभार व धन्यवाद.