मानवी शरीर म्हणजे निसर्गाचा एक सुंदर अविष्कार आहे. समस्त प्राणिमात्रां पेक्षा संपूर्ण वेगळी उभट शारीरिक ठेवणं व विकसित मेंदू लाभल्यामुळे मानवाने प्रगतीचे अनेक टप्पे पार करत पृथ्वीच्या कक्षा भेदून ब्रह्माण्डात संशोधन करत आहे. शास्त्रज्ञांनी विविध क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतली असली तरी सद्य स्थितीत अनेक व्यक्तींना मूलभूत गरजा भागवताना नाकी नऊ येत आहेत. त्यात शारीरिक आरोग्या बद्दल बोलायचं झालं तर आजारांवर ठोस औषधं उपलब्ध नाहीत. जी काही आधुनिक औषधं अस्तित्वात आहेत त्यांचे काही ना काही दुष्परिणाम आहेत. गंभीर आजारांमुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागत आहेत. माणसाने चंद्रावर पोहचण्या इतकी प्रगती केली असली तरी साधे मधुमेह, रक्तदाब सारखे आजार व कर्करोगा सारख्या जटील आजारावर संपूर्णपणे बरा होण्यासाठी खात्रीशील उपचार उपलब्ध नाही. अश्या आजारांवर उपचार म्हणजे आजारी व्यक्तींना त्यांच्या संपूर्ण जीवन काळ औषधं घ्यावी लागतात हे दुर्दैव आहे.
आधुनिक जीवनशैली
आयुर्वेद काळ व आत्ताचा काळ यात जीवनशैलीत बराच फरक आहे. बदलत्या व अवास्तव अपेक्षान मुळे व्यक्ती व वस्तूंचं महत्व बदलत चाललं आहे. सद्य स्थितीला पैसा, संपत्ती व छानछुकीच्या विविध वस्तू याला माणसापेक्षा जास्त महत्व आलं आहे. त्यामुळे स्वताःच्या आरोग्याकडे डोळसपणे पाहून स्वताःचेच आरोग्य जाणीव पूर्वक सुस्थितीत ठेवण्यात हलगर्जीपणा होत आहे. मुळात शरीर स्वास्थ्य हे सामाजिक, वैचारिक, मानसिक, कौटुंबिक स्वास्थ्यावर अवलंबून आहे. बदलत्या काळा नुसार पैसे जमवण्यासाठी वाढत चाललेली प्रत्येक क्षेत्रातील स्पर्धा. या स्पर्धेत अनेक व्यक्ती गरजेपोटी, नाईलाजास्तव किंवा अवास्तव अपेक्षांमुळे सहभागी झाले आहेत. असमाधानी वृत्ती व नवीन येणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा हव्यास त्यासाठी लागणार अमाप पैसा त्यामुळे येणारा ताण हे ही आरोग्य बिघाडाचे महत्वाचे एक कारण आहे. आरोग्य बिघाडाचे सर्वात महत्वाचे कारण म्हणजे आधुनिक जीवनशैली.

आयुर्वेदानी सांगितलेली दिनचर्या व ऋतुचर्या आपण पाळली तर आपले आरोग्य व आयुर्मान चांगले सुधारेल. आधुनिक काळात व शहरी जीवनात आयुर्वेदा नुसार सांगितलेली दिनचर्या व ऋतुचर्या पाळणे जरी खूपच कठीण गोष्ट असली तरी अशक्य नक्कीच नाही. श्री पतंजली महामुनी यांनी त्यांच्या योगसूत्रे या ग्रंथात सूत्र रूपाने योगशास्त्राच्या आठ अंगांचे वर्णन केले आहे. त्यातील किमान काही अंगांच तंतोतंत पालन केल्यास आपले शारीरिक, मानसिक, सामाजिक व कौटुंबिक आरोग्य सुधृढ, निरोगी व दीर्घायू लाभण्यास नक्कीच मदत होईल.
शरीर एक अत्याधुनिक यंत्र
आता हेच बघा ना एखादी गाडी सुस्थितीत चालण्यासाठी जसे गाडीचे इंजिन, ब्याटरी, टायर मधील हवा या मुख्य घटकांची आवश्यकता असतेच तसेच सुस्थितीतील इतर बरेच भाग जसे क्लच, गियर, ब्रेक अश्या विविध भागांची आवश्यकता असते. एव्हडं सर्व असूनही ती गाडी बरेच दिवस एकाच जागी उभी केली तर पटकन सुरु होत नाही. गाडी बरेच दिवस एकाच जागेवर ठेवल्यास ब्याटरी, इंजिन, टायर यांच्यावर विपरीत परिणाम होत असतात. गाडी चुकीच्या पद्धतीने, चुकीच्या गियरवर चालवल्यास गाडी लवकर खराब होते. गाडीत चुकीचे इंधन (स्वस्तातील इतर पर्याय) वापरले तरी गाडी लवकर खराब होऊ शकते. अयोग्य रस्त्यावर चुकीच्या गतीने गाडी चालवल्यास गाडी लवकर खराब होते. शिवाय गाडीला योग्य कालावधी नंतर सर्व्हिसिंग करावे लागते. गाडीत शुद्ध इंधन भरतो. गाडी म्हणजे एक मशीन आहे. कोणतेही मशीन सुयोग्य पद्धतीने वापरले नाही व वेळच्या वेळी सर्व्हिसिंग केले नाही तर लवकर खराब होते. त्याच प्रमाणे आपले शरीर देखील एक स्वयंचलित मशीन आहे. इतक्या वर्षात आपल्या शरीराचे सर्व्हिसिंग कधी केले होते? असा प्रश्न स्वता:लाच विचारल्यास त्याचे उत्तर बऱ्याच जाणां कडून कधीही नाही असे असेल. आपले शरीर अमूल्य आहे हे आपल्याला माहित असूनही आपण काही हजार ते काही लाख रुपये किंमत मोजून विकत घेतलेल्या गाडीची काळजी जास्त घेतो. थोडक्यात आपण गाडीची जेव्हडी काळजी घेतो तेव्हडी आपल्या बॉडीची म्हणजेच शरीराची काळजी घेत नाही असे दिसून येते. त्यामुळेच बऱ्याच व्यक्तींच्या आरोग्यावर कळत नकळत दूरगामी दुष्परिणाम दिसत असतात.

खरेतर आपले शरीर स्वयंचलित यंत्र जरी असले तरी ते सुस्थितीत चालण्यासाठी आवश्यक असलेली अंतर्बाह्य स्वच्छता तसेच शरीरासाठी सुयोग्य अन्न, पाणी व इतर घटक नियमित योग्य प्रमाणात पुरवण्याची जवाबदारी आपलीच असते. आता हेच बघाना एखादं हॉस्पिटल अत्याधुनिक यंत्रणेने सुसज्ज केले; शिवाय आंतराष्ट्रीय दर्जाचे स्पेशालिस्ट डॉक्टर्स तत्परतेने निदान व उपचार करण्यासाठी २४ तास तैनात ठेवले परंतु तेथील ICU / ICCU वॉर्ड मध्ये किंवा हॉस्पिटल मध्ये सर्वत्र कोणत्याही प्रकारची स्वच्छता न पाळता तिथे वॉर्ड पासून सर्वत्र घाण, दुर्गंधी, किटाणू, विषाणू तसेच अशांत वातावरण असले तर तिथे ठेवलेला पेशंट लवकर बरा होणे दूरच उलट आणखी आजारी पडण्याची शक्यता जास्त आहे. शिवाय तेथील डॉक्टर्स सुद्धा आजारी पडण्याची शक्यता जास्त आहे. अगदी तसेच आपल्या शरीरात निसर्गाने अत्याधुनिक यंत्रणा तैनात ठेवली आहे. त्या यंत्रणेला काम करण्यासाठी शरीराची अंतर्गत स्वच्छता, पोषण व वातावरण सुयोग्य ठेवणे आपली जबाबदारी आहे. तसे केले नाही तर आतील यंत्रणा बिघडून आपण आजारी पडू.
आपण आपल्या शरीरास गृहीत धरत असतो का?
आपल्या शरीरातील विविध संस्था त्यातील अवयव, अंतर्स्रावी ग्रंथी, हॉर्मोन्स, मज्जा तंतू, शुद्ध अशुद्ध रक्त वाहिन्या या सर्वांचे कार्य आपल्या पहिल्या श्वासा पासून शेवटच्या श्वासा पर्यन्त अहोरात्र चालू असतं. त्या सर्वाना त्यांचे कार्य सुयोग्य पद्धतीने सुरळीत ठेवण्यासाठी त्यांना आवश्यक असलेले घटक पुरवण्याची जबाबदारी सर्वस्वी आपली स्वतःची आहे. परंतु त्या सर्व अवयवांचे २४ x ७ आयुष्यभर चालणारे कार्य आपल्याला माहित असूनही तितक्या गांभीर्यानी आपण घेत नाही. उलट मी कसाही राहीन पण शरीरातील यंत्रणेने सुयोग्य काम केलेच पाहिजे अश्या अविर्भावात आपण बेजबाबदारपणे वागत असतो. कितीही प्रमाणात व कोणत्याही वेळी पोटात सोडलेला कोणताही अन्न घटक पचवण्याची जबाबदारी शरीरातील यंत्रणेची आहे अश्या अविर्भावात पचन संस्थेवर ताण आणणारे तसेच निव्वळ जिभेस चवदार लागणारे परंतु शरीरास अयोग्य असणारे अन्न आपण पोटात ढकलत असतो. असे वारंवार होत राहिल्यास आतील यंत्रणा बिघडते व आपणास विविध आजारांची लक्षणे दिसू लागतात. हे सर्व आपणास माहित असूनही आपण आपल्या शरीरास गृहीत धरत असतो. शारीरिक आरोग्यासाठी आपण आज जर वेळ दिला नाही तर भविष्यात वेळ व पैसा दामदुपटीने मोजावा लागेल. शिवाय शारीरिक व मानसिक त्रास होईल तो वेगळाच.
निरोगी जीवनाच्या आठ पायऱ्या
शरीर निरोगी ठेवण्यासाठी महत्वाचे घटक म्हणजेच शुद्ध हवा, शारीरिक गरजे नुसार पाणी, सकस षड्रस अन्न, झोप, शरीराची अंतर्बाह्य स्वच्छता, व्यायाम, सूर्य प्रकाश, मेडिटेशन या सर्व गोष्टी नियमित पुरवल्यास आरोग्य नक्कीच चांगले राहण्यास मदत होईल. आरोग्या संदर्भातील अधिक माहिती आमच्या यूट्यूब चॅनल वर आहे. आमच्या आरोग्य सखा या यूट्यूब चॅनलआवर्जून बघा.
वरील लेख सर्वसाधारण माहिती म्हणून प्रस्तुत केला आहे. वर दिलेल्या माहितीचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत तरी खबरदारी म्हणून तज्ञानचा सल्ला घ्यावा.
वरील लेखा बद्दल आपला अभिप्राय जरूर द्या. वरील विषया संदर्भात काही अधिक माहिती हवी असल्यास किंवा विषयाला धरून एखाद्या नवीन मुद्या बद्दल माहिती हवी आल्यास आम्हाला जरूर कळवा; आम्ही लवकरात लवकर योग्य माहिती aarogyasakha.com वर प्रकाशित करू. आमची वेबसाईट पाहिल्या बद्दल आपले मनापासून आभार व धन्यवाद.