Select your reliable medical solution
विषय प्रवेश
एखादी व्यक्ती आजारी असेल तर त्या व्यक्तीनी कोणत्या उपचार पद्धतीचा (पॅथीचा) अवलंब करायला हवा? असा प्रश्न विचारला तर त्याला वेगवेगळी उत्तर मिळू शकतात. सर्वसाधारणपणे आजाराचे स्वरूप व तीव्रता यावर वरील प्रश्नाच उत्तर अवलंबून असत. अश्या परिथितीत आपण सर्वप्रथम आपल्याला ज्ञात असलेल्या तज्ञाचा सल्ला आपण घेत असतो. आजच्या काळात विविध उपचार पद्धती अस्तित्वात आहेत. त्यात ज्याला ज्या पॅथीचा चांगला अनुभव आला असेल तो त्या पॅथीची स्तुती करत असतो. त्यात असा प्रश्न त्या त्या पॅथीच्या तज्ञांना विचारला तर आपलीच उपचार पद्धती (पॅथी) कशी योग्य आहे हे तर ते सांगतीलच शिवाय सांगताना उदाहरण व दाखले पण त्या प्रश्नाच्या उत्तरा दाखल देतील.
सर्वसामान्यांना माहीत असलेल्या काही उपचार पद्धतींचा उल्लेख करायचा झाल्यास त्यात ऍलोपॅथी, होमियोपॅथी, आयुर्वेदिक उपचार (पंचकर्म), निसर्गोपचार, युनानी, सु जोक, मसाज, फिजिओ थेरेपी, न्यूरोपॅथी, स्टेमसील थेरेपी, ऍक्यूप्रेशर, ऍक्यूपंचर, मॅग्नेट थेरेपी, वॉटर थेरेपी, घरगुती उपचार, रेकी, गाईडेड मेडिटेशन, मड थेरेपी, म्युझिक थेरेपी…. वगैरे अजून अनेक ज्ञात अज्ञात पॅथी / थेरेपी उपलब्द आहेत.
वास्तव
प्रत्येक पॅथीला विशिष्ठ मर्यादा असतात त्याच प्रमाणे बऱ्याचवेळा त्या त्या पॅथीच्या तज्ञानना पण मर्यादा असतात. त्या मर्यादे पलीकडे आजार बळावल्यास त्या पॅथीचे तज्ञ काहीही उपाय करू शकत नाहीत. तो तज्ञ दुसऱ्या तज्ञा कडे आजारी व्यक्तीला पाठवतो. तस पाहिल तर प्रत्येक पॅथीची जशी प्रबळ बाजू असते तशीच कमकुवत बाजू पण असते. म्हणजेच एखाद्या पॅथीत झटपट बरे होता येईल पण काही दुष्परिणाम (साईड इफेक्ट) पण होतील. तर एखाद्या पॅथीत दुष्परिणाम (साईड इफेक्ट) दिसणार नाहीत पण बरं होण्यासाठी बराच कालावधी लागेल. अश्या परिस्थितीत योग्य निर्णय घेऊन उपचार सुरु करण्यासाठी संभ्रम निर्माण होऊ शकतो.
अनेकदा आजारी व्यक्तीच्या नात्यातील, मित्र मंडळीं पैकी एखाद्या पॅथी बाबत सल्ला देत असतात; शिवाय त्या पॅथीतील नेमक कोणत्या तज्ञा कडे जायला पाहिजे ते ही सांगतात. असा सल्ला प्रत्येकवेळी योग्य असतोच याची खात्री देता येत नाही. कारण त्या सल्यामागे आजाराचं स्वरूप, एकत्रित व्याधी असण्याची शक्यता, आजार प्रबळ होण्याचा कालावधी या सारख्या अनेक गोष्टींचा योग्य विचार केलेला असतोच असे सांगता येत नाही. त्यातील कोणत्या तज्ञाकडे जाणं योग्य आहे हा ही एक प्रश्न उपस्थित होऊ शकतो. म्हणजेच एखादी पॅथी जरी निवडली तरी कोणत्या तज्ञाला किती अनुभव आहे. त्यांनी केलेले निदान किती अचूक असतात. ह्या गोष्टींना विचारात घ्यावे लागते. शिवाय असे लक्षात येते की अनेकांना काही उपचार पद्धती मानवत नाहीत किंवा विशिष्ठ पॅथी चे उपचार घेतल्यामुळे काही शारिरीक त्रास होतात. म्हणूनच विविध व्याधींवर विविध उपचार पद्धतीचा (पॅथीचा) अवलंब आजारी व्याक्तींसाठी केला जातो.
आजार झटपट बरा होण्याकडे अनेकांचा कल असतो; त्यामुळे अनेकदा साईड इफेक्ट होतात माहीत असूनही काही विशिष्ठ पॅथी मधून उपचार घेतले जातात. अनेक वेळा होणारे साईड इफेक्ट हे मूळ आजाराच्या तुलनेत नगण्य असतात.
वरील प्रश्नाचे नेमके उत्तर देणे थोडे कठीण असले तरी प्रत्येक उपचार पद्धती (पॅथी) आपापल्या ठिकाणी योग्य व चांगली आहे. असे आपण म्हणू शकतो. पुढील चित्रातील काही गोष्टी प्रतीकात्मक दृष्ट्या विविध उपचार पद्धतींना जोडल्या तर प्रत्येक पॅथी / थेरेपी ही योग्य व चांगली असल्याचा प्रत्यय येईल.
वरील चित्रात दशभुजा देवी आहे व तिच्या प्रत्येक हातात काहींना काही आयुधं आहेत. शिवाय ती देवी एका सिंहा वर आरूढ आहे. समोर दोन राक्षस आहेत व त्या राक्षसांवर ती देवी विविध आयुधांचा प्रहार करत आहे. हे चित्र नीट निरीक्षण केल्यास असे लक्षात येईल की राक्षस किती प्रबळ आहे, किती अंतरावर आहे, एकाच वेळी किती आयुधांनी प्रहार करायचा अश्या सर्वच गोष्टींचा विचार केलेला आपणास दिसतो. देवीच्या हातात अनेक आयुधं जरी असली तरी प्रत्येक आयुधाची उपयुक्तता वेगवेगळी आहे हे ही आपल्या लक्षात येते. राक्षस व देवी मधील अंतरा नुसार व आवश्यक्ते नुसार उपयुक्तता वेगवेगळी आहे.
हे चित्र प्रतीकात्मक दृष्ट्या आपले आजार व विविध पॅथींना जोडूया
वरील चित्रातील राक्षस म्हणजे आपल्याला होणाऱ्या विविध व्याधी. देवीच्या हातातील आयुधं म्हणजे अस्तित्वात असलेल्या विविध उपचार पद्धती (पॅथी). देवी म्हणजे आपण स्वतः / आपली प्रबळ मानस शक्ती व सिंह म्हणजेच आपली रोग प्रतिकार शक्ती.
आजच्या आधुनिक काळात व प्रगत अश्या वैद्यकीय क्षेत्रात अनेक आजारांवर तज्ञ जोड उपचार / पर्यायी औषध (Alternative Treatment / Medicine) घ्यायला सांगतात. जसे न्यूरोलॉजि संदर्भात काही आजार असल्यास ऍक्यूपंचर सारखा जोड उपचार घेण्यासाठी तज्ञ सुचवतात. लकवा किंवा सांध्यांची शल्यचिकित्सा (सर्जरी) झाली असल्यास फिजिओ थेरेपी सारखा जोड उपचार तज्ञ सुचवतात.
वरील प्रश्नाच वेगळं उत्तर तुमच्या कडे असल्यास आम्हाला जरूर कळवा.
वरील उदाहरण प्रतीकात्मक आहे. उपचार पद्धती निवडताना आजाराचे गाम्भीर्य समजून योग्य निर्णय घेतल्यास आजारी व्यक्तीला लवकरात लवकर बरे वाटून त्याचे रोजचे जीवन पुन्हा सुरु होईल यात शंका नाही. आपण कधीही आजारी पडू नये म्हणून प्रयत्नशील राहूया. तुम्हा सर्वांना सुदृढ, निरोगी आयुष्यासाठी भरगोस शुभेच्छा.
वरील लेखा बद्दल आपला अभिप्राय जरूर द्या. वरील विषया संदर्भात काही अधिक माहिती हवी असल्यास किंवा विषयाला धरून एखाद्या नवीन मुद्या बद्दल माहिती हवी आल्यास आम्हाला जरूर कळवा; आम्ही लवकरात लवकर योग्य माहिती aarogyasakha.com वर प्रकाशित करू. आमची वेबसाईट पाहिल्या बद्दल आपले मनापासून आभार.
