Home Remedies for Headache

MRP Rs. 170/- Free Courier in Maharashtra
Contact 9820618906
डोकेदुखी एक समस्या
डोकेदुखी ही एक आम समस्या आहे. एखाद्या कामा बद्दल किंवा व्यक्ती बद्दल काय डोकेदुखी आहे! असे आपण कधी ना कधी ऐकले असेलच. यात खरोखरची डोकेदुखी जरी नसली तरी डोकेदुखी मधील वेदना या वाक्यातून दर्शवते. जवळपास सर्वानाच कधी ना कधी डोकेदुखी या समस्येला सामना करावा लागतो. डोकेदुखीचे काही प्रकार आहेत. अनेक वेगवेगळ्या कारणांमुळे डोकेदुखी ही समस्या उद्भवत असते. आयुर्वेदा नुसार शीर शूळचे म्हणजेच डोकेदुखीचे 11 प्रकार सांगितले आहेत. त्यात आधुनिक विज्ञानाने आणखी काही डोकेदुखीचे प्रकार शोधून काढले आहेत. डोकेदुखी ही समस्या आपल्या मज्जासंस्थेच्या माध्यमातून व मेंदूमधील रक्त वाहिन्यां मधील बदलामुळे आपणास जाणवतो. शरीरातील घटकांचे संतुलन बिघडल्यास त्यात प्रामुख्याने रक्त प्रवाह डोक्यामध्ये जास्त प्रमाणात पाठवला जातो. त्यामुळे रक्तवाहिन्या फुगतात. त्यामुळे डोक्यातील काही भागात किंवा पूर्ण डोक्यात खूप जास्त दाब निर्माण होतो. मज्जासंस्था खूपच संवेदनशील असल्यामुळे अतिरिक्त रक्त प्रवाहाचा दाब सहन करू शकत नाहीत त्यामुळे त्याची प्रतिक्रिया म्हणून आपले डोके दुखते. आपल्या शारिरात विशिष्ठ बिघाड झाला असेल तर ते दर्शवण्यासाठी शरीराकडून डोकेदुखीच्या माध्यमातून संकेत दिले जातात.
डोकेदुखीचे प्रकार व कारणे
डोकेदुखीचे काही प्रकार आहेत. त्यात प्रामुख्याने प्राथमिक, मध्यम व तीव्र डोकेदुखी, अर्धशिशी (मायग्रेन) व क्लस्टर डोकेदुखी असे आधुनिक प्रचलित प्रकार आहेत. यात डोकेदुखी ही काहीजणांना विशिष्ठ कारणामुळे एक दोन दिवसासाठी होते. तर काहींना आठ – पंधरा दिवसाच्या अंतरानी काही महिने ते काही वर्ष डोकेदुखी होत राहते. त्यात काहींना डोक्याचा काही भाग दुखतो तर काहींना अर्ध डोकं दुखत. काहींना डोकं दुखण्या बरोबर खांदा, सायनस, मान, डोळ्या भोवती, डोक्याच्या वर्तुळाकार भागात किंवा डोक्याच्या वेगवेगळ्या भागात डोकेदुखीचा त्रास होत असतो.
अनेक कारणांमुळे डोकेदुखी उद्भवते त्यात प्रामुख्याने आयुर्वेदा नुसार वात, पित्त, कफ यांचे प्रमाण संतुलित मात्रे पेक्षा जास्त झाले की डोकेदुखी उद्भवू शकते. शिवाय बराच काळ उपाशी राहिल्यास, पुरेशी झोप न झाल्यास किंवा जास्त झोप झाल्यामुळे, प्रखर प्रकाशामुळे, कर्कश्य आवाजामुळे, तीव्र वास काहीकाळ नाकात गेल्यास, काही जणांना लांबचा प्रवास केल्यामुळे, खूप सर्दी झाल्यामुळे, खूप खोकला येत असल्यास, पित्त वाढलं असल्यास, ठराविक वेळी चहा, कॉफी न मिळाल्यास अति अल्कहोल सेवांनामुळे, बराच वेळ डोक्याला ऊन लागल्यामुळे, काही जणांना हवामानातील बदलामुळे, अति विचार करत बसल्यामुळे, मानसिक कारणामुळे, डोक्याला गंभीर दुखापत झाली असल्यास, तणावपूर्ण नाते संबंधानमुळे, कामकाजाच्या ठिकाणच्या त्रासामुळे, अनुवंशीक कारण, तणाव, नैराश्य, चिंता यांमुळे, काही औषधांच्या दुष्परिणामांमुळे, दृष्टी संबंधात चष्म्याचा नंबर कमी जास्त झाल्यास, महिलां मध्ये मासिक पाळीच्या कालावधीत पुढे मागे दोन तीन दिवस किंवा हार्मोन्स मध्ये बदलामुळे, बद्धकोष्ट वारंवार होत असल्यास, अयोग्य दिनचर्येमुळे, उच्च रक्तदाबामुळे, अश्या अनेक कारणांमुळे डोकेदुखी ही समस्या उद्भवू शकते.

खरंतर डोकेदुखी हा अगदीच छोटा आजार आहे असे गृहीत धरले जाते. एकदा डोकेदुखी सुरु झाली की अनेक व्यक्ती आपापल्या परीने उपाय योजना करत असतात. त्यात नेमके या समस्ये मागील खर कारण न समजल्याने डोकेदुखी वरचाच पण अयोग्य घरगुती उपचार कळत नकळत केला जातो. उपाय लागू न पडल्यामुळे केलेल्या उपायालाच दोष दिले जातात. शिवाय समस्या आणखीन वाढते. काही जणांना ती समस्या दीर्घकाळ सहन करावी लागते. अनेक व्यक्ती रासायनिक औषध तज्ञानच्या सल्य्या शिवाय घेतात. त्यामुळे त्याचे आणखीन वेगळे दुष्परिणाम होण्याची शक्यता असते.
घरगुती उपचार
अशी ही डोकेदुखी सुरु झाली की काहीही करायला सुचत नाही. एकदा डोकेदुखी सुरु झाली की अनेक व्यक्ती शांत ठिकाणी, अंधारात किंवा कमी प्रकाशात बसतात. तर काही व्यक्ती डोक्याला रुमाल किंवा एखाद कापड बांधून ठेवतात. (डोक्याला कापड बांधत असल्यास खूप घट्ट बांधू नये.) कोणत्या कारणामुळे डोकेदुखी झाली आहे हे नीट समजत नसल्यास सर्वसाधारणपणे सर्व डोकेदुखीत आराम मिळेल असे उपचार आपण पाहू.

सामान्य डोकेदुखीसाठी
खोबरेल तेलात / राई तेल + लवंग तेल २ थेंब / तुळशीचे तेल २ थेंब / काळं मिरे तेल २ थेंब / लसूण तेल २ थेंब / २ लसूण पाकळ्या उगाळून त्या तेलाने खांदा, कपाळ, कानशिल, मान व डोक्याला हलका ते मध्यम दाब देऊन मसाज करावा.
बदाम तेल २-३ थेंब नाकात सोडावे.
बदाम + तुळशीचे तेल १-१ थेंब नाकात सोडावे
पायाला झेपेल इतके व पायाचे घोटे बुडतील इतके गरम पाणी टबात घेऊन त्यात २ चमचे मीठ घालावे व त्यात दोन्ही पाय ठेवून पंधरा मिनिटे बसावे. (लो बीपी चा जास्त त्रास असणाऱ्या व्यक्तींनी साधे गार पाणी वापरावे.)
पंधरा मिनिटे दीर्घ श्वसन करावे.
पंधरा मिनिटे आपणास आवडणारा गंधाचा सुगंध घ्यावा.
निलगिरी तेल २-३ थेंब रुमालात घेऊन हुंगावे किंवा गरम पाण्यात टाकून वाफ घ्यावी.
गावरान गाईच्या दुधाचे साजूक तूप (शक्यतो घरी बनवलेलं) कोमट करून दोन्ही नाकपुड्यां मध्ये प्रत्येकी 2-2 थेंब सोडावे. रात्री झोपायच्या आधी केल्यास अधिक फायदेशीर.
रात्री झोपण्यापूर्वी एक कप गरम दुधात गावरान गाईच्या दुधाचे साजूक तूप (शक्यतो घरी बनवलेलं) एक चमचा घालून प्यावे.
मधुमेह नसलेल्या व्यक्तींसाठी एखादा गोड पदार्थ खाऊन त्यावर गरम दूध प्यावे.
तेलकट, मसालेदार, आंबट व तिखट पदार्थ डोकेदुखी काळात टाळावे.
पित्तामुळे होणारी डोकेदुखी
पुढील प्रयोग शक्यतो सकाळी उपाशीपोटी करावा. यासाठी वमन हा उत्तम पर्याय आहे. वमन करताना ३-४ ग्लास कोमट पाण्यात एक चमचा मीठ घालून प्यावे किंवा पोटभर नुसते कोमट पाणी प्यावे. दोन मिनिटातच तोंडात दोन बोटे घालून जिभेच्या मागच्या बाजूला बोटानी घासल्यास वमन क्रिया करण्यास सोपे जाते. इतर वेळी हा प्रयोग नास्ता,जेवण झालेले असल्यास किमान ३-४ तासा नंतर करावा.
थंड दूध किंवा दुधी भोपळ्याचा रस एक ग्लास भरून प्यावा.
एक मोठ्या आवळ्याचा रस किंवा एक आवळा सेवन करावा.
एक मध्यम आकाराचा चमचा भरून कोरफडीचा गर सेवन करावा.
एक चमचा ओवा + मध चावून चावून सेवन करावा व वरती कोमट पाणी प्यावे.
खोबरेल किंवा बदाम तेलाने डोक्याला हलका ते मध्यम दाब देऊन मसाज करावा.
सर्दीमुळे किंवा कफामुळे होणारी डोकेदुखी
तुळशीच्या पानांचा रस काढून किंवा तुळशीचे तेल + बदाम तेल दोन्ही नाकपुड्यां मध्ये प्रत्येकी एक एक थेंब सोडावे.
रिठा पावडर एक चमचा + एक चिमूट मिरी पावडर + एक चिमूट सुंठ पाव कप पाण्यात घालून उकळून घ्यावे तयार झालेले मिश्रण थंड झाल्यावर गाळून दोन्ही नाकपुड्यां मध्ये दोन दोन थेंब सोडावे.
जलनेती किंवा दंड नेती करावी (जलनेती वरील लेख याच वेबसाईटवर योग मथळ्यात उपलब्द आहे.)
पंधरा मिनिटे दीर्घ श्वसन करावे. नाक कफामुळे भरलं असल्यास सोपा पण श्वासोत्श्वास जोरात करावा लागेल असा कोणताही व्यायाम प्रकार करावा. (उदा. उड्या मारणे, सूर्य नमस्कार घालणे.)
वरील उपायांमुळे नाकातील, सायनस मधील सर्व सर्दी बाहेर येईल. जेव्हढा कफ निघेल तेव्हढा कफ बाहेर काढावा डोकेदुखी पासून आराम मिळतो.
राई किंवा तिळाच्या तेलाने डोक्याला हलका ते मध्यम दाब देऊन मसाज करावा.
वातामुळे होणारी डोकेदुखी
एक चमचा ओवा २-३ कप पाण्यात उकळवून घ्यावा व त्या पाण्याची वाफ नाका तोंडावाटे आलटून पालटून घ्यावी.
२ चमचे ओवा कापडात घेऊन छोटीशी पोटली बनवावी व तवा तापवून त्यावर ती पोटली गरम कारवी व ओटीपोटाला शेक घ्यावा.
एक चमचा ओवा + मध चावून चावून सेवन करावा व वरती कोमट पाणी प्यावे.
बदाम तेल २ थेंब दोन्ही नाकपुड्यात सोडावे.
तीळ किंवा बदाम तेलाने डोक्याला हलका ते मध्यम दाब देऊन मसाज करावा.
रोज ध्यान (मेडिटेशन) किमान २० मिनिटे करावे.
रोज प्राणायाम १५ ते २० मिनिटे करावा. कपालभाती, भस्त्रिका, अनुलोम विलोम व दीर्घ श्वसन करावे. या पैकी किमान कोणतेही दोन प्रकार करावे.
पवन मुक्तासन करावे.
१५ ते २० मिनिटे मध्यम ते गतिशील गतीने चालावे.
एक चमचा गावरान गाईच्या दुधाचे साजूक तूप (शक्यतो घरी बनवलेलं) सेवन करावे व वरती कोमट पाणी प्यावे.
इतर उपचार
मासिक पाळी किंवा हार्मोन्स बदल झाल्यामुळे त्रास होत असल्यास; २ चमचे ओवा व छोटीशी पोटलीचा उपाय वरती दिल्या प्रमाणे करावा.
तणाव, नैराश्य, चिंता यामुळे त्रास होत असल्यास ध्यान (मेडिटेशन) करावे. मोकळ्या हवेत / बागेत फिरून यावे.
झोप न झाल्या मुळे त्रास होत असल्यास थोडावेळ झोप घ्यावी.
अल्कहोल जास्त प्रमाणात झाल्यास अर्ध्या लिंबाचा रस पाव कप पाण्यात घालून प्यावा.
डोकेदुखी वरचेवर होत असल्यास तेलकट, मसालेदार, आंबट व अति थंड पदार्थ टाळावे.
जवळपास सर्वच प्रकारच्या डोकेदुखीत डोक्याला तेल लावून हलका ते मध्यम दाब देऊन मसाज करावा.
डोक्याला कोणत्याही प्रकारची अंतर व बाह्य दुखापत झाल्यामुळे डोके दुखत असल्यास तज्ञानचा सल्ला घ्या. अश्या डोकेदुखीत डोक्याला मसाज करू नये.
डोकेदुखी मागील कारणं शोधून घरगुती उपचार करताना आपलं आपणच उपाय करत असतो. त्यामुळे काळजीपूर्वक उपचार निवडावा. घरगुती उपचारांनी डोकेदुखी दोन ते तीन दिवसात थांबली नाही तर तंज्ञानचा सल्ला जरूर घ्यावा.
वरील उपचार हे व्यक्ती, प्रकृती व ऋतुमाना नुसार कमी अधिक फायदेशीर होऊ शकतात. ह्याचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत तरी खबरदारी म्हणून ज्या व्यक्तींना वर वापरलेल्या औषधींचा काही विशेष त्रास असेल त्यांनी तज्ञानचा सल्ला घ्यावा.
वरील लेखा बद्दल आपला अभिप्राय जरूर द्या. वरील विषया संदर्भात काही अधिक माहिती हवी असल्यास किंवा विषयाला धरून एखाद्या नवीन मुद्या बद्दल माहिती हवी आल्यास आम्हाला जरूर कळवा; आम्ही लवकरात लवकर योग्य माहिती aarogyasakha.com वर प्रकाशित करू. आमची वेबसाईट पाहिल्या बद्दल आपले मनापासून आभार व धन्यवाद.