Jalaneti is a one of the important cleaning method for nosal path
आयुर्वेदाचे आभार मानू तेव्हडे थोडे आहेत. आयुर्वेदानी दिलेली मानवी जीवन पध्दती आपण आपली दैनंदिन जीवन पध्दती म्हणून वापरात आणली तर आपणास निरोगी दीर्घायु लाभेल यात शंका नाही. आज कोविड १९ सारखे विषाणून पासून धोका उद्भवू नये म्हणून आधुनिक तंत्रज्ञान व तज्ञ आपणास हात स्वच्छ धुण्यास सांगत आहेत. पण हेच आयुर्वेदाने हजारो वर्षा पूर्वी लिहून ठेवले आहे की बाहेरून घरात आल्यावर हात, पाय व तोंड स्वच्छ धुवावे जेणे करून मानवी शरीरासाठी घातक असलेल्या जिवाणू किंवा विषाणूं पासून आपणास धोका उद्भवत नाही. शिवाय हस्तान्दोलन न करता लांबूनच हात जोडून नमस्कार करून सामाजिक अंतर पाळण्याची कायम स्वरूपी व्यवस्था फार पूर्वीपासून करून ठेवली आहे. सकाळी व संध्याकाळी दिवसातून दोन वेळा अंघोळ केली तर आपण मानवी शरीरासाठी घातक असलेले विविध जिवाणू व विषाणूं पासून अधिक सुरक्षित राहू.
सध्या कोविड १९ व्हायरस प्रकरण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. (हि पोस्ट दिनांक ०६/०७/२०२० ला लिहिली आहे.) त्यावर कोणतीही लस अजूनही तयार नाही. त्या मुळे अनेक तज्ञ आपल्याला रोगप्रतिकार शक्ती वाढवण्याचा सल्ला देत आहेत. तर हल्ली काही तज्ञ जलनेती करण्याचा सल्ला देत आहेत. ह्याच जलनेती बद्दल आपण जाणून घेऊया.
नेतीचे प्रमुख प्रकार
शरीर शुद्धीकरणाच्या सहा क्रियांपैकी एक महत्वाची शरीर शुद्धीक्रिया म्हणजे नेती. नासिका मार्गाचा म्हणजेच नाकपुड्यांपासून घश्यापर्यंतच्या श्वसन मार्गाची स्वच्छता करण्याच्या क्रियेला नेती असे म्हणतात. यात वेगवेगळ्या पद्धती व प्रकार आहेत.
नेतीचे प्रमुख चार प्रकार आहेत. या चार पैकी कोणत्याही पद्धतीचा वापर करून नासिका मार्गाची स्वच्छता करता येते. आपणास जी कोणती पद्धत सोपी वाटते ती वापरून नासिका मार्ग शुद्धी करता येते. ते चार प्रकार पुढील प्रमाणे आहेत. १) जलनेती २) सूत्रनेती ३) दंडनेती ४) वस्त्रनेती. ह्या पानावर आपण फक्त जलनेती बघणार आहोत.
◉ जलनेती
खरतर घेरंड संहिता या ग्रंथात कपालभातीचे तीन प्रकार सांगितले आहेत. त्यातील दुसरा व तिसरा प्रकार म्हणजेच जलनेती. जलनेती म्हणजे मिठाच्या पाण्याने नासिका मार्ग धुण्याची क्रिया आहे. ही क्रिया करण्यासाठी तोटी असलेल्या विशिष्ट भांड्याची आवश्यकता असते. ही क्रिया सकाळी उठल्यावर पोट रिकाम असताना करावी.
ही क्रिया करण्यासाठी १ नेती भांडं, १ लिटर गरम पाणी (साधे पाणी घेतले तरी चालते.) व १ चमचा मीठ या साहित्याची अवश्यकता असते.
सर्व प्रथम १ लिटर पाण्यात १ चमचा मीठ घालावे. मीठ पूर्ण विरघळल्यानंतर नेतिच्या भांड्यात पाणी घ्यावे. नंतर नेती भांड हातात धरून त्याची तोटी एका नाकपुडीत ठेवावी. त्याच वेळेस तोंडाने श्वासोश्वास सुरु ठेवून मान विरुद्ध बाजूला तिरकी करून (म्हणजेच उजव्या नाकपुडीत तोटी धरली असेल तर मान डाव्या बाजूस तिरकी करावी.) पाणी हळू हळू ओतायला सुरुवात करावी. त्याच वेळेस तोंडाने श्वासोश्वास सुरुच ठेवावा. मान तिरकी केल्या मुळे दुसऱ्या नाकपुडीतून पाणी आपोआप बाहेर येईल. हीच क्रिया एका दमात न करता थोडं थोडं थांबून २-३ टप्यात करावी. नंतर नेती भांडं बाजूला ठेवून कपालभाती प्रमाणे तोंडानी श्वास घेऊन नाकाने श्वास जोरात सोडावा. असं ५-७ वेळा करावे. जेणेकरून नाकात सायनस भागात अडकलेले पाणी पूर्णपणे बाहेर येईल. अशीच क्रिया डाव्या नाकपुडीत नेती भांड्याची तोटी ठेवून करावी. दोन्ही नाकपुड्यातून जलनेती झाल्यावर कपालभाती प्रमाणे तोंडानी श्वास घेऊन नाकाने श्वास जोरात सोडावा. असं ५-७ वेळा करावे. असे केले नाकी तर सायनस मध्ये पाणी अडकून सर्दी होऊ शकते किंवा डोके दुखू शकते.
वरील क्रिया पाण्याचे तापमान व मिठाचे प्रमाण कमीजास्त करून केल्यास नाकातील त्वचेला वेगवेगळ्या जाणिवांची सवय होते मग ऋतुमानानुसार वातावरणात होणारे बदल नासिका मार्गाला सहन करण्याची शक्ती वाढते. त्यामुळे सर्दी व सायनस यांचे त्रास उद्भवत नाहीत. शिवाय नासिका मार्गात जर सूज आली असेल तर ती बारी होते.

वरील क्रिया खाली बसून किंवा उभ राहून सुद्धा करता येते. मीठ हे जंतू नाशक आहे. पाणी व मीठामुळे नासिका मार्ग चांगला धुवून निघतो. साधारण एका नाकपुडीसाठी अर्धा लिटर पाणी वापरावे.
वरील जलनेती नेतिभांड्या शिवाय करता येते. त्यात तोंडात पाणी घेऊन तोंड बंद ठेवावे व तोंडात धरलेले पाणी दोन्ही नाकपुड्यां मधून बाहेर काढावे. किंवा याच्या उलट ही क्रिया करता येते. म्हणजेच नाकानी पाणी ओढून घेऊन तोंडाने सोडावे. कोणतीही पध्दत वापरताना नव्याने कोणी करत असल्यास हि क्रिया तज्ञान समोर करावी. जलनेती ही दैनंदिन जीवन पद्धतीचा भाग करु नये. जेव्हा गरज असेल तेव्हाच करावे. ही क्रिया शिकण्यासाठी काही दिवस रोज केली तरी चालेल. कोविड १९ किंवा कोणत्याही नासिका मार्गाने संक्रमण होणाऱ्या घातक जिवाणू किंवा विषाणूं संसर्ग काळात रोज किंवा जेव्हा संक्रमणाची लक्षण जाणवत असल्यास रोज जलनेती केली तरी चालेल.
जलनेतीचे फायदे
वरील क्रिया पाण्याचे तापमान व मिठाचे प्रमाण कमीजास्त करून केल्यास नाकातील त्वचेला वेगवेगळ्या जाणिवांची सवय होते मग ऋतुमानानुसार वातावरणात होणारे बदल नासिका मार्गाला सहन करण्याची शक्ती वाढते. त्यामुळे सर्दी व सायनस यांचे त्रास उद्भवत नाहीत. शिवाय नासिका मार्गात जर सूज आली असेल तर ती बरी होते. नासिका मार्गाला जोडलेल्या नाक व डोळे या अवयवांची तसेच घाश्यातील स्नायुंची कार्यक्षमता सुधारते. कफदोष जातो. सर्दी, डोकेदुखी, ताप येणे सारख्या व्याधी होत नाहीत. उतार वयातील विकार होत नाहीत. शरीरासाठी घातक असलेल्या जिवाणू किंवा विषाणूं पासून सौरक्षण मिळते. नासिका मार्ग मोकळा झाल्या मुळे श्वास घेताना खूप हलके व फ्रेश वाटते.
जलनेती ही क्रिया तज्ञानच्या देखरेखी खाली करावी.
वरील लेखा बद्दल आपला अभिप्राय जरूर द्या. वरील विषया संदर्भात काही अधिक माहिती हवी असल्यास किंवा विषयाला धरून एखाद्या नवीन मुद्या बद्दल माहिती हवी आल्यास आम्हाला जरूर कळवा; आम्ही लवकरात लवकर योग्य माहिती https://aarogyasakha.com वर प्रकाशित करू. आमची वेबसाईट पाहिल्या बद्दल आपले मनापासून आभार.