Ideal method of bathing
शरीर बाहेरून स्वछ करण्याची सोपी व महत्वाची क्रिया म्हणजे आंघोळ करणे. आंघोळ करण्यासाठी साधे गार पाणी किंवा तापवलेले गरम पाणी गरजे नुसार वापरले जाते. स्थळ काळा नुसार आंघोळ करण्याच्या जागा व पद्धती वेगवेगळ्या असतात. फार पूर्वीपासून आंघोळीचे पाणी तापवण्यासाठी बंब, चूल, शेगडी असे पर्याय होते. तर नंतरच्या काळात स्टोव्ह, गॅस स्टोव्ह असे पर्याय होते. आता गॅस गिझर, इलेक्ट्रिक गिझर असे पर्याय आहेत. आंघोळ करण्यासाठीची जागा फार पूर्वी पासून आजही काही ठिकाणी थेट नदीत उतरून आंघोळ केली जाते. वेगवेगळ्या पाणवठ्याच्या ठिकाणी खास करून गावां मध्ये किंवा पाड्यां मध्ये विहिरीवर तलावावर पाणी उपसून काठावर आंघोळ केली जाते. बाकी ठिकाणी जुजबी कापडाचे किंवा कुडाचा वापर करून आडोसा तयार करून बाथरूम म्हणून वापरले जाते. तर सर्व सामान्यान पासून उच्चभ्रून पर्यंत आंघोळीसाठी बाथरूमचा वापर केला जातो त्यात अनेक ठिकाणी शॉवर ची सोय केलेली असते. काही उच्चभ्रूं कडे आवड, जागा व पाण्याच्या उपलब्दते नुसार बाथ टब असतो. थोडक्यात आंघोळ ही नित्यनेमाची शरीर स्वच्छतेसाठी आवश्यक क्रिया आहे; व स्थळ, परिस्थिती नुसार वेगवेगळे पर्याय वापरले जातात. वरील पैकी कोणत्याही पद्धतीने अंघोळ केली तरी आपण खरच योग्य पद्धतीने आंघोळ करतो का ?

आयुर्वेद काळा पासून मानवी जीवन खऱ्या अर्थानी समृद्ध होण्यासाठी अनेक नैसर्गिक उपाय योजनांचा अवलंब केला जात होता. आयुर्वेदात प्रामुख्याने मानवी दैनंदिन जीवन पद्धती उपलब्ध आहे. व्यक्ती, प्रकृती, ऋतुमानानुसार आहार, विहार, व्यायाम (योग) तसेच स्नाना संबंधी उपयुक्त माहिती दिली आहे.
आंघोळीचे महत्व सर्वांना आहेच परंतु अनेक जण चुकीच्या पद्धतीने आंघोळ करत असतात. त्यामागे अनेक कारणे आहेत. जसे वेळेचा अभाव, शरीराला तेल लावण्याचा कंटाळा किंवा शरीराला तेल लावणे आवडत नाही, विशिष्ठ तेलाची ऍलर्जी असणे, स्वतःहाच्या शरीराचे आरोग्य गांभीर्यानी न घेणे, योग्य पद्धत माहीत नसणे, योग्य पद्धत माहीत असूनही ती पद्धत वापरण्याची मानसिकता नसणे, योग्य पद्धतीने स्नान करण्याचे फायदे माहीत नसणे. कळत नकळत अनेक जण स्नानाची योग्य पद्धत वापरत नाहीत. अशी अनेक कारणे असू शकतात.

चुकीच्या पद्धतीने स्नान केल्यामुळे आपल्याला अनेक समस्यांना सामना करावा लागतो. त्यात प्रामुख्याने शरीर खऱ्या अर्थाने स्वच्छ न होणे, केस गळणे, रोग प्रतिकार शक्ती कमी पडणे, पचन संस्थेची कार्यक्षमता कमी पडणे, उत्साह नसणे, सुस्ती येणे, त्वचा कोरडी पडणे अश्या अनेक आरोग्या संबंधी समस्या उद्भवू शकतात. या वर मात करण्यासाठी किंवा शारिरीक आरोग्य सुधारण्यासाठी स्नानाची योग्य पद्धत जाणून घेऊया.
गार पाणी वापरावे
रोज गार पाण्याने स्नान करा असे सांगितले तर अनेकांच्या भुवया उंचावतील. आयुर्वेदानुसार साध्या गार पाण्याने अंघोळ करणे योग्य आहे. आपल्या पैकी अनेकजण गरम पाण्याने अंघोळ करतात. परंतु आजारी व्यक्ती व्यतिरिक्त सर्वांनी साधे गार पाणी वापरावे. अगदीच साधे गार पाणी झेपत नसेल किंवा चालत नसेल तर कोमट पाणी वापरावे. शरीराला बर वाटतं म्हणून बऱ्याचदा जास्तीचे गरम पाणी वापरले जाते. गरम पाण्याने आंघोळ केल्यास त्याचे कळत नकळत शरीरावर बरेच दुष्परिणाम दिसून येतात. गरम पाणी डोक्यावर ओतल्यास केस गळती सुरु होते, सुस्ती येते, रोगप्रतिकार शक्ती कमी होणे, पचन शक्ती कमी होणे, डोकेदुखी किंवा डोक्यात तणाव जाणवणे, डोळ्यांच्या समस्या उद्भवणे, आळस जात नाही, गरम पाण्याने शरीराचे वाढलेले तापमान सामान्य करण्यासाठी अंगातून खूप घाम बाहेर पडतो. आंघोळ केल्या नंतर येणाऱ्या घामामुळे आंघोळ केल्याचा फायदा होत नाही शिवाय शरीरातील पाण्याची पातळी कमी होते.
गार पाण्याने आंघोळ करताना थेट डोक्यापासून पाया पर्यंत अश्या पद्धतीने शरीरावर पाणी घ्यावे. तर गरम पाण्याने आंघोळ करताना पाया पासून डोक्यापर्यंत शरीर ओले करावे. त्या मुळे शरीराच्या तापमानात होणारा अचानक बद्दला मुळे कधी कधी रक्ताभिसरण प्रक्रियेत रक्तात गुठळी होण्याची शक्यता असते त्या पासून सौरक्षण होते व रक्ताभिसरण सुरळीत होते.
अभ्यंग (तेल मालिश आवश्यक)
स्नाना पूर्वी शरीराला तेल चोळावे किंवा हलका मसाज घ्यावा. शरीराला तेल लावताना शरीरात मुरेल इतकेच तेल वापरावे. त्यामुळे त्वचेचे मृत झालेले सेल्स व टॉक्सिन स्वच्छ करण्यास मदत होते. शिवाय शरीरात उत्साह निर्माण होतो. त्वचा व स्नायूंना आराम मिळतो. अभ्यंग करताना रोज पूर्ण शरीराला तेल लावणे शक्य नसल्यास; किमान डोकं, कान व तळपाय यांना तरी तेल चोळून आंघोळ करावी. किमान ८-१५ दिवसातून एकदातरी पूर्ण शरीराला तेल लावून आंघोळ करावी. ऋतुमाना नुसार व प्रकृती नुसार तेलाचा वापर करावा. सर्वसाधारणपणे खोबरेल तेल, तीळ तेल, राई तेल, बदाम तेल यांचा वापर केला जातो.

स्क्रबर
त्वचेवरील त्वचेचे मृत झालेले सेल्स व टॉक्सिन्स स्वच्छ करण्यासाठी स्क्रबरचा वापर करावा. आंघोळ करताना स्क्रबर वापरल्याने त्वचेची रंध्र मोकळी होतात. त्वचेवर जमलेले त्वचेचे मृत सेल्स व टॉक्सिन्स पूर्णपणे धुतले जातात. त्वचेवरील केसांनमध्ये अडकलेले धूलिकण स्क्रबरमुळे स्वच्छ होतात. आंघोळ झाल्यावर टॉवेलने अंगावरील पाणी नुसते टिपून घेऊ नये. आंघोळ झाल्यावर खरखरीत टॉवेल वापरावा व खसखसून अंग पुसावे. त्यामुळे त्वचेवरील रंध्र मोकळी होतात. रक्ताभिसरण सुधारते. त्वचेवरील नवीन सेल्सचे कार्य सुधारते.

शरीर स्वच्छतेसाठीचे नैसर्गिक साधन
अनेक व्यक्ती आंघोळ करताना जो साबण किंवा शॅम्पू वापरतात तो बहुतेक वेळा जाहिरात पाहून किंवा साबणाचा गंध हुंगून साबण आणतात व वापरतात. बहुतेक व्यक्ती त्या साबणात किंवा शॅम्पू मध्ये वापरण्यात येणारे घटकांनची नावे न वाचताच त्याची खरेदी करत असतात. त्यात बहुतेक वेळा घातक रसायनांचा वापर केलेला असतो. अशी घातक स्वच्छतासाधन अनेकांच्या शरीराला, डोळ्यांना, त्वचेला, केसांना घातक असतात. म्हणूनच शरीर स्वच्छतेसाठी रसायन विरहित किंवा नैसर्गिक घटकांचा वापर केलेली स्वच्छता साधन वापरावीत.
रिकाम्यापोटी स्नान करावे
रिकाम्यापोटी स्नान करणे आरोग्यासाठी चांगले असते. भरल्यापोटी स्नान केल्यास पोटात अन्न असल्यामुळे शरीरातील रक्ताचा जास्तीचा पुरवठा पचन क्रिया चांगली होण्यासाठी पचन संस्थे कडे केला जातो. परंतु अन्न सेवन करून स्नान केल्यास संपूर्ण शरीराचे तापमान बदलते ते नियंत्रित ठेवण्यासाठी पचन क्रियेत आवश्यक असणारा रक्ताचा प्रवाह संपूर्ण शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी कार्यरत होते. त्यामुळे आतडे आकुंचित होते, पचन क्रिया नीट होत नाही व असे वारंवार झाल्यास बद्धकोष्ट होण्याची शक्यता असते. पचनाच्या समस्या वाढतात. नास्ता केल्या नंतर किंवा जेवल्या नंतर स्नान करायचे झाल्यास किमान २-३ तासा नंतर करावे.
आंघोळीचा कालावधी
आंघोळ खूप घाई घाईत किंवा बराचवेळ अंगावर पाणी घेत बसू नये. आंघोळ ही नुसती शरीर स्वच्छ करायची प्रक्रिया नाही. या शरीर स्वच्छते बरोबर मनाची एकाग्रता असणे गरजेचे आहे. कोणतीही गोष्ट आपण जेव्हा मन लावून करतो तेव्हा ती गोष्ट नीट व चांगली होते. शांत मन एकाग्र करून आंघोळ केल्यास शरीर शुचिर्भूत होतेच शिवाय शरीर शुद्धीचे मानसिक समाधान लाभते. आंघोळ करताना २-३ वेळा अंगाला साबण लावू नये तसे केल्यास त्वचा कोरडी पडते. रोज सकाळी लवकर उठून आंघोळ करणे केव्हाही चांगले असते. दिवसातून किमान एकदा व जास्तीत जास्त दोन वेळा आंघोळ केल्यास आरोग्यासाठी चांगले असते.
अभ्यंग स्नानाचे फायदे
आपण दिवाळीत अभ्यंग स्नान करतो. अभ्यंग स्नान म्हणजेच अंगाला तेल लावून मसाज करणे व शरीरात तेल मुरल्या नंतर स्नान करणे. त्यावेळी आपण उटणं लावतो त्यामुळे त्वचे वरील चिकटलेले तेल व मृत पेशी धुवून टाकण्यास मदत होते शिवाय त्वचेची रंध्र मोकळी होतात. अंगा वरील घामाचा दर्प जाऊन उटण्याचा मंद सुवास मनाला उल्हासित करतो. उटणं हे नैसर्गिक घटकांन पासून बनवलेले असल्यामुळे शरीराची कोणत्याही प्रकारे हानी होत नाही. डोक्याला तेल लावल्यामुळे डोक्यात कोंडा होत नाही, केस गळती, पांढरे केस, डोके दुखी, तुटके केस यांच्या पासून बचाव होतो. केस चमकदार होतात. अंगाला तेल लावून मसाज केल्यामुळे त्वचा मुलायम होते. स्नायू पुष्ट होतात. शरीरातील सांध्यांची क्षमता सुधारते, रक्ताभिसरण सुधारते.
वरील माहिती व्यक्ती, प्रकृती व ऋतुमाना नुसार कमी अधिक फायदेशीर होऊ शकते. ह्याचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत तरी खबरदारी म्हणून ज्या व्यक्तींना वर उल्लेख केलेल्या तेलांचा काही विशेष त्रास असेल त्यांनी तज्ञानचा सल्ला घ्यावा.
वरील लेखा बद्दल आपला अभिप्राय द्या; शिवाय हा लेख लाईक व शेअर जरूर करा. वरील विषया संदर्भात काही अधिक माहिती हवी असल्यास किंवा एखाद्या नवीन विषया बद्दल माहिती हवी आल्यास आम्हाला जरूर कळवा. आम्ही लवकरात लवकर योग्य माहिती aarogyasakha.com वर प्रकाशित करू.
आमची वेबसाईट पाहिल्या बद्दल आपले मनापासून आभार व धन्यवाद.
